मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याचे कळते. विशेष म्हणजे शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा येत्या काही दिवसात होईल. त्यात १० ते १२ मंत्री शपथ घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
राज्यातील शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा होईल. यातील मंत्र्यांचा २० जुलै रोजी मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात नेमकं कोण-कोणत्या आमदारांना संधी मिळते?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाहीय. परंतू एकनाथ शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांची मुंबईत एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे संकेत दिले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महत्वाच्या १० ते १२ खात्यांसाठी मंत्री शपथ घेतील.