लंडन (वृत्तसंस्था) कॅन्सर (World Cancer day 2022) म्हटलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सर संसर्गित पेशी रक्त व लसिकांमधून स्थानांतरीत होतात आणि शरीराच्या दुसऱ्या भागावर हल्ला करतात. परिणामी पूर्ण शरीरावर त्यांचा परिणाम होतो. पण आता निरोगी पेशींना हानी न पोहोचता कॅन्सरला नष्ट करण्यासाठी एक खास बॉल (Magnetic balls) तयार करण्यात आलं आहे. जो ३३ दिवसांतच कॅन्सरचा खात्मा करतो.
कॅन्सर ट्युमर्समध्ये मॅग्नेटिक बॉल्सचा धमाका करून त्यांना नष्ट केलं जाईल. मॅग्नेटिक बॉल आणि एमआरआय मशीनच्या मदतीने हे उपचार केले जातील. आतापर्यंत एमआरआय मशीन कॅन्सरचं निदान करण्यासाठी वापरला जायचा पण आता उपचारातही त्याचा उपयोग होणार आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी २ मिमीचा एक लहान मॅग्नेटिक बॉलसारखं एक उपकरण तयार केलं आहे.
रुग्णांच्या हाडामध्ये छेद करून हा बॉल शरीरात सोडला जाईल. मॅग्नेटिक बॉल शरीरात पोहोचल्यानंतर त्याला ट्रॅक केलं जाईल. एमआरआय मशीन या बॉलला गरम करेल. या प्रक्रियेला ४५ सेकंद लागतील. हा बॉल ट्युमर्सपर्यंत पोहोचवला जाईल आणि नंतर एक धमाका होईल. यामुळे ट्युमर्स कमकुवत होतील आणि निरोगी पेशींवर त्याचा परिणाम होणार नाही. या मॅग्नेटिक बॉलचे अंश शरीरातून बाहेर निघतात. या संपूर्ण प्रक्रियेला ३० मिनिटं लागतात.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार संधोकांनी कॅन्सरवरील या अनोख्या उपचाराचा प्रयोग कॅन्सरग्रस्त उंदारवर केला, जो यशस्वी ठरला. ३३ दिवसांत उंदरातील कॅन्सर ट्युमर नष्ट झाला. डुकरावरही याचा प्रयोग करण्यात आला. हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मॅग्नेटिक बॉल्समुळे माणसांवर उपचार करण्याची आशा वाढली आहे. लवकरच प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या रुग्णांवर याचा प्रयोग केला जाणार आहे. युनिव्हर्सिटी कॉलेच लंडनमधील संशोधक मार्क लिथगोए यांनी सांगितलं कि, स्थानिक रुग्णालयात एमआरआय मशीन असतात. या मशीनमार्फतच कॅन्सरची चाचणी आणि उपचार दोन्ही होईल.