रायपूर (वृत्तसंस्था) काँग्रेसचे टूलकिट म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिट प्रकरणात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात छत्तीसगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी पात्रा व सिंह यांना चौकशीसाठीची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार या दोघांचा जबाब व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविला जाणार आहे.
रमण सिंह यांच्याकडील काँग्रेसच्या म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिटीची माहिती पोलिसांनी मागितली आहे. त्याच बरोबर त्यांना ‘एआयसीसी रिसर्च प्रोजेक्ट’ व ‘कॉर्नरिंग नरेंद्र मोदी अँड बीजेपी ऑन कोविड मॅनेजमेंट’ याचा दस्तावेज कुठून मिळाला अशी विचारणा पोलिसांनी नोटीसमध्ये केली आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या मंगळवारी काँग्रेसच्या कथिट टूलकिटवरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात असून तो व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचा दावा भाजपने केला होता. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी भाजपच्या नेत्यांनी ज्यात संबित पात्राही होते त्यांनी काँग्रेसचे म्हणून एक बनावट टूलकिट ट्विटरवर प्रसिद्ध केले व काँग्रेसची भाजपला बदनाम करण्याची रणनीती पक्षात वरपासून खालीपर्यंत कशी कार्यान्वित केली जात आहे, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी काँग्रेसने हे टूलकिट भाजपच्याच आयटीसेलने तयार केले असून भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बी. एल. संतोष, संबित पात्रा व अन्य नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी भाजपच्या या नेत्यांविरोधात फिर्याद दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नेते व वकील अमन पवार यांनी म्हटले होते. काँग्रेसने ट्विटरलाही एक पत्र लिहून नड्डा, इराणी, पात्रा व अन्य नेत्यांची ट्विटर अकाउंट बनावट टूलकिट प्रसिद्ध केले म्हणून रद्द करावे अशी मागणी केली होती. काँग्रेसचे नेते राजीव गौडा व पक्षाच्या सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात अफवा पसरवणे व बनावटगिरी करत असल्याचा आरोप करत या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करावे अशीही मागणीही तक्रारीत केली होती. छत्तीसगडमध्ये संबित पात्रा व भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
संबित पात्रांचे आरोप काय होते?
या कथित टुलकिट संदर्भात भाजपचे प्रवक्ते व नेते संबित पात्रा म्हणाले होते की, कोरोनाच्या महासाथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची व त्यांची बदनामी करण्याची संधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडली नाही. कोरोनाचा आढळलेला नवा प्रकार हा मोदी विषाणू असल्याचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे. त्यात काँग्रेस परदेशी पत्रकारांना हाताशी धरून भारताची बदनामीही करत आहेत. राहुल गांधी सकाळी उठून रोज ट्विट करतात, या ट्विटमधील माहिती या टुलकिटमधील असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला होता. काँग्रेसचे अनेक नेते मोदींना पत्र लिहितात. कधी अध्यक्षा सोनिया गांधी तर कधी अन्य कोणी. हे सगळे ठरवून केले जात आहे आणि हे टुलकिटद्वारे होत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला होता.
संबित पात्रांना ट्विटरचा दणका
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ‘कोविड-१९ टुलकिट’च्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचा आरोप केला होता, संबित पात्रांचा हा आरोप ट्विटरने फेटाळला आहे. पात्रा यांचे कथित ट्विट ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत आपण समाविष्ट करत असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले.