नाशिक (प्रतिनिधी) गर्दीची संधी साधत महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी मिनी पाकीट चोरून नेले. या पाकिटात रोकडसह सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख १२ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज होता. ही घटना वर्दळीच्या शालिमार भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली शंकर पतंगे (रा. भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पतंगे या कॉलेज रोड भागात आल्या होत्या. शुक्रवारी (दि. १४) सकाळी त्या नाशिकरोड येथे जाण्यासाठी रिक्षातून शालिमार येथे उतरल्या. देवी मंदिर रिक्षा थांबा या भागातील गर्दीची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चेन उघडून मिनी पाकिट चोरून नेले. या पाकिटामध्ये दोन हजार २०० रुपयांची रोकड व मंगळसूत्र असा ३ लाख १२ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज होता.
















