चाळीसगाव (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बालाजी ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७० हजारांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शहरातील एम. जी. नगरमधील रुपेश सुरेश येवले (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. रुपेश येवले यांचे बाजार समितीतील गाळा क्रमांक १७ मध्ये बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. १९ डिसेंबरला दुपारी ४ ते ४.५० या वेळेत रुपेश येवले हे कामात व्यस्त असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानातील कॅबिनमधील टेबलचा ड्रॉवर शिताफीने तोडला. तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली. अवघ्या ५० मिनिटांत ही चोरी करण्यात आली. तर, बाजार समितीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत. तर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. गणेश सायकर यांनी तपास सुरू केला. बाजार समितीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.















