जळगाव ( प्रतिनिधी ) : महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे. ममुराबादकडून जळगावात येणाऱ्या कारची मंगळवारी स्थिर सर्व्हेक्षण पथकाने तपासणी केली. या तपासणीत कारमध्ये २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने आढळून आले. या मुद्देमालाच्या पावत्या संबंधितांकडे नसल्याने पथक व तालुका पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात दिला.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या वेगवेगळ्या सहा मार्गांवर स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी केली जात आहे. अशाच प्रकारे ममुराबाद तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना जळगावकडे येणाऱ्या (एमपी ०९, सीयू २२१८) क्रमांकाच्या कारची तपासणी केली. या कारमध्ये २९ लाख रुपयांची रोकड, तीन किलो चांदी, आठ तोळे सोने
मिळून आले.
शुद्धता तपासणीसह खरेदीसाठी आले जळगावात
कारमधील राकेश दामोदरदास श्रॉफ (वय ४८), जस राकेश श्रॉफ (वय २१, दोघे रा. पांडुमल चौक, बऱ्हाणपूर) व चालक नवीन किशोरीलाल भावसार (वय ३५, रा. शिकारपुरा, बऱ्हाणपूर) यांना या मुद्देमालाविषयी पथकाने विचारणी केली. त्या वेळी त्यांनी बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून
जळगाव येथील सराफा दुकानांमध्ये सोन्याची शुद्धता तपासणी करण्यासाठी व नवीन दागिने खरेदी करण्यासाठी रोकड व सोने-चांदी घेऊन जात असल्याचे त्यांनी पथकाला सांगितले.
मुद्देमाल सराफ पेढी मालकाचा
हा मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील एका सराफ पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे तिघांनी जबाबात सांगितले आहे. भरारी पथकाचे प्रमुख अभिषेक सुर्यवंशी, स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख यशवंत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोहेकॉ अशोक यादव, दुर्गेश पासी, मनपा कर्मचारी जगन्नाथ सोनवणे ही कारवाई केली.
मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात
पथकाने पकडलेला मुद्देमाल तालुका पोलिस ठाण्यात नेला. त्याठिकाणी संपुर्ण मुद्देमालाचा पंचनामा करून सदर मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. पावत्या सादर केल्यानंतर खात्री करून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
















