धरणगाव (प्रतिनिधी) अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर धरणगाव पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने शुक्रवारी रात्री पकडले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी पुढील कारवाईसाठी महसूल विभागाला पत्र लिहिले आहे.
या संदर्भात अधिक असे की, शुक्रवार १४ जानेवारी रोजी रात्री पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक पेट्रोलींग करीत असतांना सोनवद रोडवर विहीर फाट्याजवळ महिंद्रा युवो 775 डि.जे.कंपनिचे लाल रंगाचे बिना नंबरचे ट्रॅक्टर ट्रालीसह वाळुची वाहतूक करीत असतांना मिळून आले. पोलिसांनी सदर ट्रॅक्टरवरील चालकास नाव-गाव विचारल्यावर त्याने त्याचे नाव महेंद्र बाळू ठाकरे (वय 30 वर्ष, धंदा ड्रायव्हर रा.खामखेडा ता.धरणगाव जि.जळगाव) असे सांगीतले. परंतू त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मुळ कागदपत्रे नव्हते. त्यामुळे सदर ट्रॅक्टर ट्रालीसह वाळूने भरलेली व चालकासह धरणगाव पोलीस स्थानकात सुरक्षीततेच्या दृष्टीने ताब्यात ठेवण्यात आले आहे. तसेच महसूल विभागाला पत्र देऊन त्यांच्या प्रतीनिधीमार्फत आवश्यक फौजदारी अथवा नियामानुसार दंडात्मक कार्यवाही होणेसाठी पत्र दिले आहे.