नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, शिक्षम सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा केली. या बैठकीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्या न घेण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात १२ वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी CBSE कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या लेखी परीक्षेला ४ मे पासून सुरुवात होणार होती. सध्या देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर केली होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीला अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी किंवा दुसरा मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली होती. नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.