मुंबई (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंगळवारी (8 मार्च 2022) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. तसेच अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकील पत्राचा राजीनामा दिला असल्याची माहिती देखील गृहमंत्र्यांनी दिलीय. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का?
देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांचे 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन (Sting operation pen drive) असलेले 29 वेगवेगळे पेन ड्राईव्ह सादर केले होते. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. यावर आज गृहमंत्र्यानी सविस्तर निवेदन देत मराठा विद्या प्रसारक मंडळासंबंधी वादाची सविस्तर माहिती दिली. तसेच मागील ३०० दिवसापासून संस्थेला पोलीस बंदोबस्त असल्याचेही ते म्हणाले. सुशांत सिंग प्रकरणात घटना मुंबईत घडली. गुन्हा बिहारमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर सीबीआय चौकशी झाली. त्यामुळे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित घटना पुण्यात जरी घडली असली तरी निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्याचा दाखला दिला. तसेच प्रत्येक केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे बरोबर नाही. महाराष्ट्रातील पोलीस दलावर तुमचा विश्वास नाही का? मी कुणाची पाठराखण करणार नाही, परंतु हे संपूर्ण प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. यामागे कोण आहे, कोण दोषी आहे त्याच्यावर काय कारवाई करायची हे पहावं लागेल.
प्रवीण चव्हाण यांचा आपल्या वकिलपत्राचा राजीनामा
गिरीश महाजन यांच्याविरोधात आम्ही षडयंत्र रचतोय असा आपला आरोप आहे, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेची स्थापना १९१७मध्ये झाली. भोईटे आणि पाटील या दोन गटात वाद आहे, कोर्टात हा वाद सुटेल. पण यानिमित्ताने सांगायचंय की पोलीस बंदोबस्त घेऊन या संस्थेला शाळा का चालवावी लागते. तीनशेपेक्षा जास्त दिवस पोलीस बंदोबस्त या संस्थेला दिला. खरी वस्तूस्थिती समाजासमोर आली पाहिजे, त्याबाबत कारवाई सुरु केलेली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की घटना पुण्यात घडली गुन्हा निंबोरीत दाखल केला. सुशांतसिंगच्या केसमध्येही घटना मुंबईत घडली आणि गुन्हा बिहारमध्ये दाखल केला. आणि नंतर तो सीबीआयकडे वर्ग केला. दरम्यान, पेन ड्राईव्हचा तपास करणार, प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे, तो राजीनामा स्विकारलेला आहे, याप्रकरणाची तपासणी सीआयडीला देण्याचा निर्णय जाहीर करतो. या तपासातून खरी वस्तूस्थिती समोर येईल, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे
गिरीश महाजन निर्दोष सूटले तर मलाही आनंदच
गिरीश महाजनांविरोधात आमचे सरकार काही षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला गेला. मात्र, या आरोपात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटले आहे. मविप्रसंबंधी गुन्ह्यात गिरीश महाजन निर्दोष सुटले तर मलाही आनंदच होईल. राज्यात कायदा आणि सु्व्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे, या विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपा कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. व्हिडीओची मोडतोड करण्यात आली आहे. व्हिडीओ आणि आवाज मॅनिप्युलेट केले आहेत. या स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भात चौकशी केल्यावर सत्य समोर येईल, असे म्हटले होते.















