जळगाव (प्रतिनिधी) राज्यशासन व जिल्हा प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करीत शहरासह जिल्ह्यातील चर्चमध्ये ख्रिस्त जयंती (Christ’s birthday)चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील पांडे डेअरी चौकातील डॉ. ॲण्ड रेव्ह रेड विल्यम शिलेंडर मेमोरिअल अलायन्स चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या चर्चची स्थापना १९२५ मध्ये झाली असून चर्चची नवीन वास्तू १९९८ मध्ये बांधण्यात आली आहे हे शहरातील सर्वात जुने शहर आहे.
आज सकाळी १० वाजता रेव्हरंट शशिकांत एम.वळवी यांच्या उपस्थितीत प्रार्थना व उपासना करण्यात आली. तत्पूर्वी ख्रिस्ती बांधवांनी ख्रिसमस कॅरल्स म्हणजे नाताळ गिते म्हटली. त्यात प्रामुख्याने युवक संघ व बालकांचा समावेश होता. त्यानंतर बायबल वाचन करण्यात आले. विशेष म्हणजे विश्वशांती, जागतिक आरोग्य, ओमायक्रॉन महामारीतून सर्व मानव जातीचा बचाव व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. शशिकांत वळवी यांनी येशूचे महात्म्य विषद केले व येशूच्या शिकवणीनुसार आचरण केल्यास मनाला शांती मिळते, असे प्रतिपादन केले.
उपासनेनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना आलिंगन व हस्तांदोलन न करता, भारतीय रूढी परंपरेनुसार दोन्ही हात जोडून, नमस्कार करून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. या नाताळ प्रार्थना सभेत शहरातील ख्रिस्ती समाज बहुसंख्येने उपस्थित होता. नाताळ उत्सव यशस्वी करण्यासाठी सचिव प्रा. विनय गायकवाड, पंच सदस्य प्रकाश शिंदे, एस.बी. गावीत, ज्योती मकासरे, अनिल मसिदास, संजय पारधनी, एलीजाबेथ वळवी यांच्यासह स्मिता पारधनी, पवन गवांदे, अमोल देशपांडे, संदीप कसोटे, किरण देशपांडे, रेवती कसोटे, प्रणाली बनसोडे तसेच युवक संघ, संडे स्कूल व महिला संघाचे प्रमुखांनी सहकार्य केले.