मुंबई (वृत्तसंस्था) केंद्राने महाराष्ट्राकडे लसीकरणासंदर्भात विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र मोठं राज्य आहे. या राज्यात मुंबईसारखं शहर आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यात केंद्राने मदत केली. पण इतर राज्यांनाही समान पद्धतीची मदत करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील लोकही भारतीयच आहे हे विसरू नका”, असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला.
सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारची कानउघाडणी केली. महाराष्ट्र विकास आघाडी हा राज्यातील एक यशस्वी प्रयोग आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन भिन्न विचारांचे पक्ष सध्या राज्याचे सरकार चालवत आहेत. देशातील सर्व भाजपविरोधी पक्षांनी यापासून धडा घ्यायला हवा. अशा प्रकारची आघाडी युपीएच्या माध्यमातून नवी आघाडी निर्माण करावी असा विचार ममतादीदींना मांडला आहे. महाराष्ट्राने देशाला नवीन मार्ग दाखवला आहे. त्यावरून कसं पुढे जायचं ते सर्व विरोधी पक्षांनी मिळून ठरवण्याची गरज आहे”, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. उद्धव ठाकरे फोनवरून त्यांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे पवारांची भेट नक्की कधी घेणार आहेत हे मला माहिती नाही. पण जेव्हा ते भेट घेणार असतील तेव्हा सगळ्यांना कळवतील”, असं राऊत म्हणाले.
















