चोपडा (प्रतिनिधी) महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृती व्हावी व भविष्यातील धोके कळावे यासाठी येथील रोटरी क्लब तर्फे गर्भाशय व स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २०० पेक्षा जास्त महिलांची विनामूल्य तपासणी करण्यात आली. तपासणीअंती ज्या महिलांना केवळ औषधोपचाराची आवश्यकता आहे त्यांना रोटरी क्लब चोपडाच्या वतीने मोफत औषधी पुरवण्यात आली.
या उपक्रमासाठी रोटरी मिडटाऊन अमरावती या क्लबच्या वतीने तयार करण्यात आलेली ही मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरणार असून त्या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात झालेल्या या तपासणी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर ,रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख डॉ. पराग पाटील, सह प्रकल्प मार्गदर्शक रोटे. संजीव गुजराथी, डॉ वैभव पाटील,रोटे. एम डबलू पाटील हे उपस्थित होते.
रोटे विलास पी. पाटील यांनी सूत्रसंचलन तर सचिव अर्पित अग्रवाल यांनी आभार प्रदर्शन केले. रोटे. डॉ. पराग पाटील आणि रोटे. डॉ. वैभव पाटील यांनी परिसरातील महिलांना भविष्यात आवश्यकता भासल्यास महिलांची पॅपस्मियर तपासणी मोफत करुन देण्यात येईल, असे यावेळी सांगितले. या तपासणी शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व अंगणवाडी सेविकांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिरासाठी रोटरी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.