चाळीसगाव (प्रतिनिधी) वन अधिकारी असल्याचे सांगून वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थिती देणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मेहुणबारे पोलिसांनी अटक केली. सदर तोतया अधिकारी हा बहाळ येथील रहिवाशी आहे.
दिनांक २० रोजी २.४५ वाजेच्या सुमारास चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शितल भास्कर नगराळे यांना जामदा येथील माध्यमिक विदयालयामध्ये वरिष्ठ सीसीएफ अधिकारी (चिफ कॉन्जरवेटीव्ह फॉरेस्ट) शाळेतील मुलांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमास आलेले असल्याचे समजले. परंतु एवढ्या मोठया हुद्द्याचे अधिकारी त्यांच्या हद्दीत कार्यक्रमासाठी आले असतांना त्याबद्दल कार्यालयास कोणालाच काही माहिती नाही, म्हणून शितल नगराळे यांना शंका आली. यामुळे त्यांनी याबाबत तात्काळ मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक आव्हाड यांना फोन करुन याविषयी माहिती दिली. तसेच पोलीस मदत मागवत त्या कार्यालयातील सहकारी सी.व्ही. पाटील (वनपाल जुवार्डी), जी. एस. पिंजारी (वनपाल घोडेगाव), राहुल पाटील (वनरक्षक शिवरे), एम.पी. शिंदे ( वनरक्षक पश्चिम जुवार्डी) यांचे सह खात्री करण्याकरीता जामदा येथे रवाना झाले.
पथक जामदा येथील माध्यमिक विद्यालयाजवळ ३.३० वाजता पोहचले असतांना त्याठिकाणी मेहुणबारे पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके व त्यांचा स्टाफ देखील पोहचला. तेंव्हा माध्यमिक विद्यालय, जामदा शाळेच्या गेटमधून ) एक जण बाहेर येतांना दिसला. त्यास तुम्ही शाळेत कार्यक्रमास आलेले फॉरेस्ट अधिकारी आहात काय?, असे विचारताच त्यांनी होय..मी नितीन रविंद्र पगारे (रा. बहाळ ता. चाळीसगाव) असून मी वन विभागात नाशिक येथे चिफ कॉन्जरवेटीव्ह फॉरेस्ट यापदावर आहे व जामदा शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमास आलो होतो, असे सांगितले.
याचवेळी शाळेचे मुख्यध्यापक यांना देखील विचारणा केली असता त्यांनी देखील तो व्यक्ती वन विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यावरून पथकाने वन विभागाचे वरिष्ठ कार्यालयात फोन केला असता सीसीएफ पदावर नितीन पगारे अशा नावाचा व्यक्त नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने स्वतः कुठेही कोणत्याच पदावर कार्यरत नसल्याची कबुली दिली. तद्नंतर त्याचा मोबाई ताब्यात घेतला असता त्याच्याकडे बनावट ओळखपत्र व शासकीय गणवेषातील फोटो त्यामध्ये आढळून आले आहेत. याप्रकरणी शितल नगराळे यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला नितीन पगारे ह्या तोतया अधिकाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून हा व्यक्ती लोकांना वन विभागात नोकरीस लावून देण्याची बतावणी करून पैसे उकळत असल्याचे बोलले जात आहे. नितीन पगारे याने कोणाची फसवणुक केली असल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन सहाय्यक पो.नि.विष्णु आव्हाड यांनी केले आहे.