चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जामडी येथील पीर बाबांच्या दर्ग्यावर तरबेज शहा याकूब शहा या २५ वर्षीय तरुणाचा दि. ८ रोजी दुपारी एकाने चाकू भोसकून खून केला होता. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरबेज शहा याच्यामुळेच आपल्या बहिणीने आत्महत्या केली होती. याचाच राग मनात धरून अल्पवयीन मुलाने पाठीवर चाकू मारून खून केला, अशी तक्रार मृताच्या घरच्यांनी दिली आहे.
जामडी येथील एका धार्मिक स्थळावर काम करणार्या तबरेज शहा याकूब शहा (34, जामडी) या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने सुमारे चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये विषारी द्रव प्राशन करीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तरबेज शहा यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तो एक महिना जळगाव सबजेलमध्ये होता. सध्या तो जामीनावर सुटलेला होता.
दरम्यान, ८ रोजी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास तरबेज जामडी गावातीलच गयबन शहा बाबा दर्गा या ठिकाणी फातिया ( धार्मीक विधी) करण्यासाठी गेला होता. तेथे तरबेजच्या पाठीत चाकूने सपासप वार केल्याने तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत तरबेजला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे सांगितले. बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून तरबेज याचा अल्पवयीन मुलाने पाठीवर चाकूने वार करून खून केल्याची तक्रार मृत तरबेजचा भाऊ अजमल शहा याकूब शहा याने दिली.
यावरून भिकन अजीज शेख, एजाज शेख भिकन शेख, मुश्ताक शेख नसीर शेख आणि अल्पवयीन तरुण (सर्व रा. जामडी चाळीसगाव) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी अल्पवयीनास ताब्यात घेत बालन्याय मंडळापुढे हजर केले. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.