चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळ मीनाक्षीताई निकम यांच्या स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या मार्फत आयोजित केलेल्या दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात जवळपास ८५ वर आणि वधू यांनी आपला परिचय करून दिला.
चाळीसगाव येथील धुळे रोड बायपास जवळील बालाजी लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात अनेक विवाह इच्छुक मुला-मुलींच्या परिवारांचे एकमेकांशी बोलणे होऊन लग्न जुळवण्याच्या मार्गावर आलेत. आजच्या या धकाधकीच्या जगात चांगल्या सुदृढ तरुण-तरुणींचे लग्न जमण्यात अनेक पालकांना दमछाक होते. अशा परिस्थितीत दिव्यांग वधू-वरांचे लग्न जमणे आणि ते होणे ही मोठी कसरत होऊन बसली आहे. म्हणून या बांधवांना देखील लग्न जुळवून ते पार पाडणे सुखकर व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, समाज कल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी, गनेशकर, पुणे येथील कर्नावट परिवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात दिव्यांग भगिनींच्या मार्फत औक्षण करून वर्धमान धाडीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराचे सर्व सदस्य आणि स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.