नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते ८० वर्षाचे होते. नरेंद्र चंचल यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.
नरेंद्र चंचल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंचल यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे. नरेंद्र चंचल यांनी अनेक स्तोत्रांसह हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. ते विशेषतः भजन गीतासाठी परिचित होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले. तर ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणंही त्यांचं प्रसिद्ध झालं. आजही त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर आहेत. त्यानंतर त्यांनी हिंदी, पंजाबी सिनेमात अनेक गाणी गायली. मार्च २०२०मध्ये नरेंद्र चंचल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते दुर्गामातेचं भजन गाताना दिसले होते. या व्हिडीओत ते कोरोनावरील गाणं गाताना दिसले होते. ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गोनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना?…’ हे गाणं गाताना ते व्हिडीओत दिसले होते.
नरेंद्र चंचल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४० रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. बऱ्याच वर्षांच्या स्ट्रगलनंतर नरेंद्र चंचल यांनी १९७३ च्या ऋषी कपूर-डिंपल कपाडिया यांच्या बॉबी या चित्रपटासाठी एक गाणे गायले होते. यासाठी नरेंद्र चंचल यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक पुरस्कार मिळाला. त्याच्याकडे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे मानद नागरिकत्वही होते.
दरम्यान, नरेंद्र चंचल यांच्या निधनावर प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चंचल यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दु:ख झालं. सर्वांचे प्रिय नरेंद्र चंचल आम्हाला सोडून गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं दलेर मेहंदी यांनी म्हटलं आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही चंचल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.