वरणगाव ता. भुसावळ (प्रतिनिधी) पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुपरवायझर, ज्युनिअर क्लार्क व वॉर्डबॉय पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ७ लाख ६९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अतुल शिवाजीराव शेटे (वय ४८, रा. अजय नगर, वरणगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी हे वरणगाव येथील एका वरिष्ठ महाविद्यालयात
प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारीनुसार संशयित आरोपी नेहा निनाद नाईक (रा. पुणे) हिने पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांवर भरती करून देण्याचे आश्वासन दिले होते.
आरोपी महिलेने फिर्यादी अतुल शेटे तसेच त्यांच्या नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे उकळले. फिर्यादी अतुल शेटे यांनी आरोपी महिलेला ४ लाख ८० हजार रुपये दिले. तसेच श्रद्धा शेटे, श्रद्धा जोशी, रेणुका महाजन व विजय घौसास या साक्षीदारांनी नोकरीच्या नावाखाली २ लाख ८९ हजार रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे एकूण ७लाख ६९ हजार रुपयांची रक्कम आरोपी महिलेने स्वीकारली.
मात्र, पैसे देऊनही कोणालाही नोकरी मिळाली नाही. तसेच दिलेली रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२३ ते ६ मार्च २०२४ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२५ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर सुभाष ढवले यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हे पुढील तपास करत आहेत. मात्र संशयित आरोपी महिला नेहा नाईक हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांमुळे बेरोजगार तरुणांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असून, अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
















