मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात एप्रिलमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. पण मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य जनतेला अद्यापही परवानगी न दिल्यावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला ट्विटरवरुन चिमटे काढले आहेत. मुख्यमंत्री साहेब आपण शिव पंख लावून दिलेत, तर लोकांना कामावर जाता येईल; तुम्ही हे करू शकता, असं म्हणत देशपांडेंनी टीकास्त्र डागलं आहे.
“सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करु शकता, आमचा सीएम जगात भारी” असे खोचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
मनसेचा रेलभरो आंदोलनाचा इशारा
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो आंदोलन करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.