मुंबई (वृत्तसंस्था) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई अचानक उच्च न्यायालयात जाणार आहेत. ते उच्च न्यायालयात जावून मुख्य न्यायामुर्ती दिपंकर दत्ता आणि इतर न्यायमुर्तींची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील काही मंत्री देखील सोबत असण्याची शक्यता आहे. या भेटीमागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरीही सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ निवडणुका घेण्याच्या दिलेल्या निकालाबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम पुढील दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी निवडणुका घेणे शक्य नसल्याची भूमिका आयोगाने घेतली होती. पण त्यानंतरही न्यायालयाने हा आदेश दिल्याने आयोगासह राज्य सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत.