अमरावती (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी समृद्धी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महामार्गाचं काम उत्तमरित्या सुरु असल्याचं म्हटलं.
समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, “समृद्धी महामार्गाचे काम चांगलं झालं आहे. १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी असा समृद्धी महामार्गाचा टप्पा सुरु केला जाईल. तर शिर्डी ते मुंबई दरम्यानचा प्रवास १ मेपर्यंत सुरु केलं जाईल. लॉकडाऊनच्या काळात कामात खंड पडण्याची भीती होती, मात्र तसे घडले नाही, काम मंदावले नाही. कामाचा दर्जा अत्यंत चांगला आहे. राज्याला अभिमान वाटेल असा काम होत आहे.” नागपूर ते मुबंई या ७०१ किलोमीटर मार्गवरील १०१ किलोमीटरचा रस्ता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातील ४९ गावातून जातो. इगतपुरीमधील २३ तर सिन्नर मधील २६ गावांचा समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नावाने नावारुपाला येणाऱ्या या विकासाच्या महामार्गात नाशिकचे ही मोठे योगदान असून पहिल्या टप्प्यात नाशिक ते शिर्डी आणि दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते मुंबई असा रस्ता खुला होणार आहेत.
आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू, असंही मुख्यमंत्री म्हणाले. या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.