चोपडा प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी शहरातील व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक पूर्वीपासून चालत आलेला बुधवारी बाजारपेठेच्या बंदचे नियम पाळत नाही. मात्र व्यापारी व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी यापुढे प्रत्येक बुधवारी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीचे अध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी ही भूमिका मांडली. बोथरा मंगल कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अनिल अग्रवाल, गोपाल पाटील, पुनमचंद शर्मा, घनश्याम माखिजा, प्रवीण जैन, श्रीकांत नेवे, नितीन जैन, नरेश महाजन, भुषण पाटील, राजू शर्मा, पुंडलिक महाजन, यशवंत चौधरी, शाम परदेशी, नितीन अहिरराव, अनिल वानखेडे, माणकलाल जैन यांनी भूमिका स्पष्ट केली . चोपडा शहरात दर बुधवारी कडकडीत बंद पाडण्यासाठी बोथरा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयात हात उंचावून सहमती दर्शवून व्यापारी बांधव व असोसिएशन पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले व सर्वांनी एक मताने ठराव पास करून दर बुधवारी चोपडा कडकडीत बंदचा निर्णय घेण्यात आला . बैठकीत निर्णय झाल्यानंतर बुधवारी ज्या व्यापारी बांधवांचे दुकाने सुरू राहतील त्यांना व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल व दंडाची वसुली झालेली रक्कम वेले येथील मानवसेवा तीर्थ या संस्थेला देणगी स्वरुपात देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी मंडळाने बुधवारी बंदचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व सर्वत्र पाळली जावी हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.