चोपडा (प्रतिनिधी) : प्रेमप्रकरणातून बहिणीचा भावानेच गळा आवळून तर प्रियकरावर गोळी झाडून दोघांची हत्या केल्याच्या प्रकरणात आता अॅड. नितीन पाटील याच्याविरुद्ध चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १३ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
प्रेम प्रकरणाच्या संशयातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) या दोघांची हत्या करण्यात आली होती. वराड रस्त्यावर दि १२ ऑगस्टला घटना घडल्यानंतर आरोपी करण उर्फ कुणाल हा गावठी कट्टा घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली होती. पहिल्या दिवशी पाच आरोपी होते. त्यानंतर आजअखेर एकूण १३ जणांना आरोपी केले आहे. यात अॅड. नितीन पाटील (रा. गरताड, ता. चाेपडा) व गावठी कट्टा पुरवणारा मध्य प्रदेशातील शेखर शिकलकर या दोघांचाही समावेश अाहे. पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी अमळनेर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला असून ११ जणांना ताब्यात घेतले आहे. अॅड. पाटील व शिखलकर या दोघं अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अॅड.पाटील व खुनातील आरोपी यांच्यात एका हॉटेलात बसून पुरावे नष्ट करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, आरोपी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना जळगाव बाल सुधारगृहात पाठवले आहे. मुलीच्या आईसह नऊ जणांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सुरुवातील यांच्याविरुद्ध दाखल झाला होता गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह भरत संजय रायसिंग (वय २२ वर्ष रा. सुंदरगढी चोपडा ता. चोपडा), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९ वर्ष रा. पंकज स्टाफ चोपडा ता. चोपडा), रत्नाबाई समाधान कोळी (वय ३७ वर्ष रा. सुंदरगढ़ी चोपडा ता. चोपडा), मयुर काशीनाथ वाकडे (वय २३ वर्ष रा. गणपती मंदिराजवळ अरुण नगर चोपडा ता. चोपडा), शांताराम अभिमन कोळी (वय ५६ वर्ष रा. शिंदेवाडा चोपडा ता. चोपडा), आनंदा आत्माराम कोळी (वय ४५ वर्ष रा. माचला ता. चोपडा), पवन नवल माळी (वय २२ वर्ष रा. पाटीलगढी चोपडा ता. चोपडा), रविंद्र आनंदा माळी (वय २० वर्ष रा. माचला ता. चोपडा) अशा ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.