चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल विश्वजवळ बोलेरो पिकअप वाहनातून अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर चोपडा पोलिसांनी कारवाई केली. यात चार गुरे आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण १८ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३ रोजी सायंकाळी करण्यात आली.
चोपडा ते धरणगाव रोडवरून दोन महिंद्रा पिकअप वाहनातून अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर हॉटेल विश्व जवळ थांबून पोलिसांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु केली.
या वेळी बोलेरो (एमएच- २०, सीजी- ९२४५) आणि (एमएच- १५, एचएच- ३८८५) या – दोनही वाहनातून ३ गायी एक गोऱ्हयाची अवैध – वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या – प्रकरणी चालक योगेश श्रीधर वैष्णव (वय ३१, रा. मंगरूळ, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) व ज्ञानेश्वर खंडू रीसवाल (वय २५, रा. आडगाव, ता. भोकरदन, जि. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. चार गुरांची किंमत २ लाख १० हजार, तर दोन बोलेरो पीकअप गाड्यांची किंमत १६ लाख असा एकूण १८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास धर्मेंद्र ठाकूर करत आहेत.