भंडारा (वृत्तसंस्था) अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे एकच धावपळ उडाल्याची घटना बाम्हणी स्मशानघाटात घडली. यावेळी जीव वाचविण्यासाठी काही जणांनी तिरडी खाली ठेवून थेट नदी पात्रात उडी मारत आपला बचाव केला. मधमाशांच्या हल्ल्यात तब्बल २०० नागरिक जखमी झालेत.
शनिवारी (२३ सप्टेंबर) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शुभम भोयर व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभमचा मृत्यू झाला होता. त्याची अंत्ययात्रा बाम्हणी येथे रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील स्मशानघाटावर गेली. यावेळी मधमाश्यांनी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची भंबेरी उडाली व नागरिक जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळू लागले. काहींनी उभ्या शेतातील उसाच्या वाडीत तर काहींनी धानाच्या शेतीत आश्रय घेतला. काही नागरिक दुचाकीने तर काही नागरिक गावाच्या दिशेने धावत सुटले. मधमाश्यांच्या हल्ल्यात सुमारे २०० नागरिक जखमीचे कळते.
तिरडी घेऊन जाणाऱ्या पाच ते सहा नागरिकांवरही मधमाशांनी हल्ला केला. यामुळे जीव वाचविण्याकरिता त्यांनी तिरडी खाली ठेवून थेट वैनगंगा नदीपात्रात उडी घेतली. सर्व जण पोहत समांतर काठावर बाहेर निघाले. अंत्ययात्रेत सर्वात समोर वाद्य वाजविणारे होते. सर्वात अगोदर त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे ते जास्त जखमी झाल्याचे कळते. यानंतर काही तरुणांनी हिम्मत करून डोंग्यावर शुभमचा मृतदेह तिरडीसह घेऊन आले. त्यानंतर शुभमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.