मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.
बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. बाळासाहेब थोरात म्हणाले की, ७ जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरुन ७ जिल्हयातील सन २०१९ तलाठी पदभरतीतील एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळवण्यात आलं आहे.
सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती.
















