नागपूर (वृत्तसंस्था) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. गर्भवती राहिल्यानंतर जेव्हा तरुणीने लग्नाचा तगादा लावला तेव्हा प्रियकराने तिच्या पोटावर हातबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. बिरेन अकान तिमुंग असे आरोपीचे नाव असून, तो कामठी रेजिमेंटमध्ये सैनिक आहे.
पीडित २२ वर्षीची तरुणी कामठी येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग म्हणून काम करते. तर, आरोपी बिरेन अकान तिमुंग (३२, रा. कामपूर, आसाम, ह. मु. कामठी) कामठी रेजिमेंटमध्ये सैनिक आहे. जुलै, २०२१ मध्ये त्याच्या पत्नीची प्रकृती खालावली. त्याने पत्नीला कामठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी दोघांची ओळख झाली. आरोपीने स्वतःचा मिलिटरी रूबाब दाखवून, तिचा पाठलाग करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडित तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. बिरेन लग्न करणार असल्यामुळे ती त्याच्या प्रेमात फसत गेली. याचाच आरोपीने गैरफायदा घेतला आणि तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.
यादरम्यान, पीडित तरुणी गर्भवती राहिली तेव्हा तिने आरोपीला लग्नासाठी तगादा लावला. पण, त्याने टाळाटाळ केली. ८ जुलै २०२३ रोजी जेव्हा पीडित तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली तेव्हा आरोपीने तिला शिवीगाळ करून गर्भ नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या पोटावर हात बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपी बिरेन अकान तिमुंगविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.