मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगरमध्ये आज एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. येथील जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले आहेत. या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये सर्वच रुग्ण होरपळून जखमी झाले आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तर इतर रुग्ण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आलं आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र त्यातील काही रुग्ण अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं, “अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घेतली. या दुर्घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ जणाना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची माहिती मी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. ही अत्ंयत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जारीर करण्यात येत असून दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.”
आगीची घटना कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.