मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तसेच राज्यपाल या नावांना पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर सर्वांचं लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत, अन्यथा पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर, शरद पोंक्षे यांच्यानतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांचं नावही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत आहे. रेणुका शहाणे यांना विधानपरिषदेवर पाठवा अशी मागणी काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.
पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्यांमुळे महाविकास आघाडीच्या वाढत्या पक्षीय बलाबलाचं मोठं आव्हान आहे. सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भाजपची ताकद विधानपरिषदेत कमी होत असल्याने वरिष्ठांसमोर आमदारांचं मनोबल कायम ठेवण्याची कसरत सुरु आहे.