मुंबई (वृत्तसंस्थां) सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये १९.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर आज बुधवारी मुंबईत १९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आता थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. भर दिवसाही मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये हलकी थंडी जाणवायला सुरूवात झाली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये हंगामातील आतापर्यंतचं सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. होसाळीकर यांनी हवामानासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. यानुसार आज परभणी विद्यापीठ इथं किमान तापमान ८.० अंश डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. आज राज्यात सर्वात कमी नोंद परभणीमध्ये झाली आहे. तर यवतमाळमध्ये १०.० अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. भारत हवामान खात्याच्या (IMD) पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासूनच ईशान्य दिशेने वेगाने थंड वारे वाहतील. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होईल तर गुरुवारपासून वाऱ्याची दिशा पुन्हा बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.