मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आळा घालण्यासाठी बंडखोरावर कारवाई करण्यासाठी आता शिवसेनेने कायद्याची मदत घेत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत शिवसेनेने विधानसभेचे उपाद्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहीलं आहे. तर दुसरीकडे सोमवारपर्यंत परत या, असा अल्टिमेट बंडखोर आमदारांना शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिला आहे.
उपाद्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदेसह गटातील १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या सोमवारपर्यंत परतण्याचा इशारा दिला अन्यथा कारवाई करु असं म्हणत शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यावरच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेना सोडून पाठीत सुरा खुपसून काहीजण गुवाहाटीला जाऊन लपले आहेत आणि तिकडूनच दावा करत आहेत, की आम्हीच खरे शिवसैनिक अहोत. बंडखोरांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाही.
अरविदं सावंत म्हणाले की, आम्ही आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि १६ आमदारांवर ही कारवाई केली जाणार आहे. सर्व बंडखोर आमदार आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे आता त्यांना गट स्थापन करता येणार नाही. याबाबत आम्ही उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं. त्यांना आम्ही सर्व समजावून सांगितलं आहे. त्याचप्रमाणे आज (शनिवार) सर्वांना नोटीसा जातील आणि त्यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात येईल यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे. शिवसेनेचा मार्ग देखील संपला आहे. आता त्यांनी प्रहारमध्ये जावं अन्यथा भाजपमध्ये जावं असा खोचक टोला त्यांनी बंडखोरांना लगावला आहे.
या बंडखोरांना नोटीसा
बंडखोर १६ आमदारांना नोटीसा बजावण्याबाबत शुक्रवारी दुपारी विधिमंडळात एक बैठक होऊन सुमारे सहा तास खल झाला. तरीही निर्णय होत नव्हता. शेवटी रात्री ९ वाजता राज्याचे महाधिवक्ता आशुताेष कुंभकोणी यांना बोलावण्यात आले. त्यांच्याशी चर्चेनंतर एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, संदिपान भुमरे, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, चिमणराव पाटील, बालाजी कल्याणकर, संजय रायमूलकर, रमेश बोरनारे यांना नोटीस बजावली.