एरंडोल (प्रतिनिधी) पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांना तालुक्यात फिरु देणार नाही, त्यांच्या गाडीच्या काचा फोडू असा इशारा एरंडोल तालुक्याचे शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी दिला आहे.
एरंडोल इथे आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात रवींद्र चौधरी म्हणाले की, पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या आमदार चिमणराव पाटील यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्या नेत्यांसाठी जीवाचं रान केलं, अंगावर केसेस घेतल्या, कार्यकर्त्यांच्या जीवावर आमदार झाले. त्या पारोळा तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी शिवसेनेसोबत गद्दारी करत बंडखोरी केली. ते खुर्चीच्या मोहापायी, पैशाच्या लोभापायी एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचा आरोप श्री. चौधरी यांनी केला. अशा पद्धतीने चिमणराव पाटील यांच्याविरोधात प्रत्येक कार्यकर्ता संताप व्यक्त करत आहे. पुढच्या निवडणुकीत चिमणराव पाटील यांना त्यांची जागा दाखवू, जर ते पुन्हा निवडून आले तर मी आत्महत्या करेल, असेही चौधरी म्हणाले. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.