मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला प्रारंभ झाला होता. परंतु, भेटीचा राजकीय हेतू नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपसोबत येण्यासाठी साद घातली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आपला कालावधी पूर्ण करणार नाही. कामे होत नसल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल. यामुळे शिवसेनेने चक्रव्यूहात न अडकता ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे. आणि रिपाईंला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे, असे आठवलेंनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावर बोलताना आठवले म्हणाले कि, उद्धव ठाकरे जवळपास एक वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एक वर्ष मुख्यमंत्री राहावे. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असा पर्याय त्यांनी सुचवला. याशिवाय भाजपसोबत आल्यास त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदे मिळतील. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीदेखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.