चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर पोलिसांनी नशामुक्त अभियान राबवण्यात सुरूवात केली असून दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक जागी अतिक्रमण केलेल्या सात दारुच्या गुत्त्यांवर कार्यवाही केली होती. अगदी अतिक्रमणही हटवले मात्र, काही हॉटेल चालक व चायनीज विक्रेते हे दारू पिण्यासाठी मद्यपींना बसू देत असल्याचा प्रकार तरीही सुरु असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडील घरगुती वापराचे सिलिंडर जप्त करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
चाळीसगाव शहर पोलीस ठाणे अंतर्गत नागद रोडवर स्थित काही चायनीज विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करीत पडदे टाकुन मद्यपींना विना परवाना दारू पिण्यासाठी बसू देत होते. रात्री विहित वेळेत दुकाने बंद करीत नसल्याने त्यांच्यावर यापूर्वी कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी चायनीज सेंटर तसेच अंडाभुर्जी विक्रेत्यांकडील सहा घरगुती वापराचे सहा सिलिंडर जप्त केले. तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी शिवराज चायनीज सेंटरचे चालक अभिषेक तिवारी, सरजी हॉटेलचे चालक मोबीन शेख गयासोद्दीन, जाँबाज चिल्ली चायनीज सेंटरचे चालक दिलावर शहा व दोस्ती गरम दुध व लस्सी सेंटरचे चालक नंदलाल भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधीकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाऴीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, अधिकारी व कर्मचार्यांनी केली. तपास योगेश बेलदार व निलेश पाटील करीत आहेत.