मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या सभांना गर्दी जमत नसल्यामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ३१ जानेवारीपर्यंत प्रचारसभा आणि रोड शो वर बंदी घातली असावी, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
यापूर्वीही पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेला गर्दी जमली नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपच्या सोयीचा निर्णय घेतला असावा, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गोव्यात भाजपला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळणार नाही, असा दावा केला. गोव्यात मनोहर पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या दोन नेत्यांनी भाजप पक्ष रुजवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, आता मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल भाजपमधून बाहेर पडला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अशा परिस्थितीत भाजपला गोव्यात बहुमत मिळणार नाही, हे मी लिहून देतो, असे राऊत यांनी म्हटले. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस ७ ते ८ जागांवर लढेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
महाविकासआघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. आणखी तीन वर्षे हे सरकार टिकेल. त्यामुळे भाजप नेत्यांकडे वेळ घालवायला काहीच साधन नाही. त्यामुळे ते पालिका आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. या खेळामध्ये त्यांनी आता राजभवनालाही सामील करुन घेतले आहे. खरंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडे मोठे संख्याबळ आहे. या संख्याबळाचा वापर करुन त्यांनी लोकशाहीच्यादृष्टीने विधायक कामं करता येतील. पण ते तसे करत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.