जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गावांमध्ये होत असलेल्या वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळवून दिली जाईल.
जळगाव तालुक्यातील नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात वादळी पाऊस व वाऱ्याने दिलेल्या जोरदार तडाख्यात मोठ्या प्रमाणात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकाळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानी संदर्भात शेतकरी, ग्रामस्थ यांचेशी चर्चा करून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसिलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी राऊत, महावितरणचे श्री. आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसह संबंधित गावांचे ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक आदि उपस्थित होते.
यावेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करण्याचीही सुचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली. बेळी, निमगांव व नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टॅकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी चिंचोली परिसरात वादळी वाऱ्याने कंटेनर पलटी होऊन मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या ठिकाणी असलेल्या बिहार येथील कामगारांची भेट घेऊन त्यांना तात्पुरता निवारा व जेवणाची व्यवस्था करण्याबाबतही यंत्रणेला सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी सांगितले की, ज्या नागरीकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्यात येत असून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत त्यांची नावे घरकुलांच्या ड यादीत असल्यास त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल. तसेच महसुल व कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल असेही सांगितले.