जळगाव (प्रतिनिधी) निवडणूक आयोगाने एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू जिल्ह्याचे उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना जिल्ह्यात साडेचार वर्ष होऊन देखील त्यांची बद्दली होत नसल्यामुळे याबाबत थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना शिववाहतुक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुलतान बेग नजीर बेग यांनी ही तक्रार केली आहे. लोही यांचे जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींसोबत संबंध असल्याने ते निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करु शकतात. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी, अशी प्रामुख्याने मागणी केंद्रीय निवडणुक आयुक्तांकडे मिर्झा यांनी करण्यात आली आहे.
जाणून घ्या…नेमकं काय म्हटलंय तक्रारीत !
सुलतान मिर्झा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन विभागातील तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. राज्य शासनाने दि. १ जानेवारी २०१९ पासून परिवहन आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त ते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या बदल्या आर्थीक लोभापोटी व अधिकाऱ्यांमार्फत एकाच क्रिम पोस्टींगवर राहण्यासाठी दिलेल्या लाचेच्या कारणामुळे केलेल्या नाहीत. यामध्ये जळगाव उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही हे जिल्ह्यात साडेचार वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांचे जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांसोबत वैयक्तिक त्यांची बदली होणे क्रमप्राप्त आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात ढवळाढवळ व हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप !
जळगाव जिल्ह्यात स्थानिक राजकारणात सहभागी आहेत. तसेच लोही हे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात ढवळाढवळ व हस्तक्षेप करत आहेत. त्याच कारणाने लाभार्थी राजकीय स्वार्थापोटी व लोक प्रतिनिधींच्या दबावाखाली त्यांची बदली प्रदीर्घ काळापासून प्रशासनाने प्रलंबित ठेवण्यात आले असल्याचाही गंभीर आरोप मिर्झा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अपर परिवहन आयुक्त, उप-आयुक्त, सह- आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कर्तव्याचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त झालेला आहे. त्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्या, अशी मागणी देखील मिर्झा यांनी केंद्रीय निवडणुक आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे केली आहे.
निवडणूक आयोगाचा बदलीचा निकष हा महसूल व पोलीस विभागासाठी आहे. आरटीओला तो लागू होत नाही. मी स्वतः बदलीसाठी अर्ज केलेला आहे.
-शाम लोही (उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव )