जळगाव (प्रतिनिधी) नाशिक विभागीय आयुक्तांकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विस्तार अधिकारी किशोर राणे यांच्याविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी तक्रार केली आहे.
दिनेश भोळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव यांच्या सनियंत्रणात जळगाव जिल्हयात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, घरकुल योजना, तसेच रुर्बन अभियान राबविण्यात येत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथे कार्यरत असलेले किशोर कृष्णा राणे विस्तार अधिकारी (सांख्यिकी) हे जून १९९४ ला अन्वेषक या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथील पदावर प्रथम नियुक्तीने रुजू झाले पासून आज पावतो सुमारे २८ वर्षे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथेच नियुक्त आहेत. विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग करतांना मर्जीतील कंत्राटदारांना विविध विकासकामे तसेच साहित्य पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याचे मार्ग श्री. राणे यांना अवगत असल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथून आजपर्यंत त्यांची बदली झाली नाही, असे भोळे यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
तसेच मधल्या काळात त्यांच्या सेवा प्रतिनियुक्तीने उपलब्ध करुन घेण्यात आल्या आहेत. असे असल्या कारणाने लेखाधिकारी (उमेद), जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) सहायक प्रकल्प अधिकारी (सनियंत्रण) । सध्याचे सहायक प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच रुर्बन अभियानाचा अतिरिक्त पदभार असे प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पदांचे पदभार किशोर राणे यांच्याकडे सोपविण्यात आले असून या पदभारांच्या माध्यमातून श्री. राणे हे प्रशासकीय कामकाजात वरिष्ठांची दिशाभूल करून पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपी देखील भोळे यांनी तक्रारीत केला आहे. श्री. राणे हे सांभाळत असलेले पदभारांचे कामकाज इतर कोणतेही कर्मचारी करू शकणार नाहीत. म्हणून एवढी वर्षे ते याठिकाणी कार्यरत आहेत, अशी बेजबाबदार उत्तरे येथील प्रकल्प संचालक देत असतात.
किशोर राणे यांच्या मनमानीमुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतील हस्तक्षेपामुळे इतर काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत किशोर राणे यांच्या सेवानिवृतीस दोन वर्षे शिल्लक असून जिल्हा परिषद सेवा नियमानुसार वय वर्षे ५३ नंतर बदली करता होणार नाही असे राणे यांचे म्हणणे आहे. तसेच सहायक गट विकास अधिकारी या पदावर पदोन्नतीसाठी ते पात्र असल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथील रिक्त सहायक प्रकल्प संचालक गट ब या पदावर पदोन्नतीने पदस्थापनेसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तरी याबाबत आपण गांभीर्याने दखल घेऊन किशोर राणे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी देखील आपल्या तक्रारी अर्जात दिनेश भोळे यांनी केली आहे.