नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा भारत सरकारला सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, भारत सरकारला हे लक्षात येत नाहीये की, या वेळी कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणूकीपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात काँग्रेस सत्तेत आल्यास न्याय योजना लागू केली जाईल असे आश्वासन दिले होते. न्याय योजनेनुसार गरीब आणि गरजुंच्या बँकेत थेट रक्कम करण्याची तरतूद होती. काँग्रेसन ही योजना छत्तीसगडमध्ये राबवली आहे. ही योजना देशात लागू करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.