नंदुरबार (वृत्तसंस्था) शहरातील दोन विसरभोळ्या तरुणांना आपल्या मोटारसायकल चोरीस गेल्याचा भास झाला. या तरुणांनी पोलिसांना कळविले, त्यांनी दोन्ही मोटारसायकली चोरीस गेल्याच्या ठिकाणी तपास केला, तर दोघांच्याही मोटारसायकली त्याच ठिकाणी आढळल्या. मात्र, यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, नंदुरबार येथील नीतेश नाथजोगी यांची दुचाकी (एमएच ३९, के २२७७) घेऊन त्यांचे मित्र कोकणी हिल परिसरातील एचडीएफसी बँकेजवळ गेले होते. या वेळी तिथून परतताना त्यांनी दुचाकी तेथेच सोडून नजरचुकीने शेजारी असणारी दुचाकी (एमएच ३९, एए २७२१) घेऊन ते परतले. यामुळे संबंधित दुचाकीस्वारांनी एटीएम बाहेर आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी तत्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधला. या दरम्यान नाथजोगी यांची दुचाकी (एमएच ३९, के २२७७) कोकणी हिल परिसरातच राहिल्याने दुचाकी चोरीला गेल्याची समजूत करत त्यांनीही तत्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क केला. पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तत्काळ दखल घेऊन दोन्ही दुचाकींचे क्रमांक ग्रुपवर टाकून दोन्ही ठिकाणी पोलिस कर्मचारी रवाना केले. यातील दोन्ही नमूद दुचाकींपैकी (एमएच ३९, के २२७७) कोकणी हिल परिसर, तर (एमएच ३९, के २२७७) तलाठी कॉलनी परिसरात आढळून आली. दोन्ही दुचाकी अवघ्या १५ मिनिटांतच आढळल्याने दोन्ही दुचाकी मालकांचा जिवात जीव आला. मात्र यात दोन्ही मोटारसायकलस्वारांच्या गफलतीतून हा प्रकार झाल्याने पोलिसांनी शेवटी कपाळावरच हात मारला.