पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता थोडक्यात हुकली आहे.आता महाआघाडीत फुटीची शक्यता असून काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी अजुनही आपल्याला सत्ता स्थापनेची आशा असल्याचा दावा केला आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरूवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झाली. दरम्यान, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पक्षाने तातडीची बैठक बोलावली आहे.
तर काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पराभव स्वीकारून त्याची कारण शोधली पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या वाईट कामगिरीमुळेच बिहार महाआघाडीपासून वंचित राहिला असंही अन्वर यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी घोटाळा करून आमच्या काही जागा पाडल्या आहेत असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. आमदारांनी महिनाभर पाटणा सोडून जाऊ नये. सरकार आपणच बनविणार आहोत असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. एनडीएमधल्या घटकपक्षांना सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असं तेजस्वी यादव यांना वाटतं आहे. त्यावेळी बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी हे संकेत देत आमदारांची आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पक्षाने तातडीची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर दिल्लीतूनही काही नेते पाटण्यात दाखल झाले असून ते आमदारांची चर्चा करत आहेत.