पणजी (वृत्तसंस्था) शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार गोव्यामध्ये काँग्रेसचे (Congress) पारडं जड असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काँग्रेसनं याआधीच भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, काँग्रेस गोव्यात आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress Party) सोबत युती करण्यास तयार आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोवा डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितलं की, कोणताही पक्ष भाजपच्या विरोधात असेल, तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. मी कोणत्याही एका पक्षाबद्दल बोलत नाहीय. परंतु, जो पक्ष भाजपला पाठिंबा देऊ इच्छित नाही, त्यांना आम्ही जागा देण्यास तयार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. ते पुढे म्हणाले, निवडणुकीदरम्यान आप आणि टीएमसीनं (TMC) आमच्यावर विविध प्रकारचे आरोप केलेत. परंतु, निकालानंतर आम्ही कोणासोबत जायचं ते लवकरच ठरवणार आहोत. भाजपला पाठिंबा न देणाऱ्या पक्षांसोबत आम्हाला काम करायचं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राव यांनी आप आणि टीएमसीवर चर्चा केलीय. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष काँग्रेसच्या संपर्कात आहे. MGP नं TMC सोबत युती करून निवडणूक लढवलीय. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी एका ट्विटद्वारे गोव्यात भाजपला तोंड देण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, काँग्रेसनं याला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळं युती होणार की, नाही हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत 17 जागा जिंकून 2017 मध्ये काँग्रेस अपयशी ठरली होती. तर, 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांसह आघाडी सरकार स्थापन केलं होतं.