मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यास कॉंग्रेस तयार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असं म्हटलं होतं. राज्यात सुरु असलेल्या सर्व घडामोडीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्याला कॉंग्रेसची कोणतीही हरकत नसेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
“मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर कॉंग्रेस सहमत आहोत, ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळी आम्ही त्यांना सपोर्ट केला. आताही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री करत असतील आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाची ते मदत मागत असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत” असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. आम्हाला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. याशिवाय जर त्यांना दुसऱ्या पक्षासोबत सुद्धा जायचं असेल तर त्याला आमची काही हरकत नसेल , असं स्पष्ट नाना पटोले यांनी सांगितलं आहे.