नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या २४ तासात एकूण १,५२,७३४ लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३,१२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत देशामध्ये १ लाख ५२ हजार ७३४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ३१२८ नागरिकांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले. नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेच मागील दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त होता. तब्बल २३८००० रुग्ण कोरोनातून बरे झाले. याआधी शनिवारी देशात एकूण १६५५५३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही एकंदर आकडेवारी पाहता काही अंशी नव्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं कळत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद पडले आहे. देशात कासव गतीने लसीकरण होत आहे. आतापर्यंत २१,३१,५४,१२९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
महाराष्ट्रात निर्बंधांचा कालावधी वाढला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवारी) जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. काल कोरोनाची रुग्णसंख्या १८ हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. शहरातील कोरोना आटोक्यात आला असला तरी ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.