मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती उघड झालं आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असं या समितीनं म्हटलं आहे.
आर्यन खान हा ड्रग्सच्या मोठा कटाचा किंवा सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा एसआयटीला आढळला नाही. क्रूझवरील छाप्यात अनेक अनियमितता झाली होती. त्या दरम्यान आर्यनला अटक करण्यात आली होती. आर्यनच्या अटकेनंतर तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात संशयाचं वातावरण निर्माण झालं. मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत क्रूझवरील छाप्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर या प्रकरणाची SIT चौकशी लावण्यात आली.
या चौकशीत आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन चॅट तपासण्याची गरज नव्हती. चॅटमधूनही तो आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिडिंकेटचा भाग असल्याचं सिद्ध होत नाही. त्याचसोबत NCB च्या नियमानुसार छापा टाकताना व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला नव्हता. गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्स सिंगल रिकव्हरी म्हणून नोंदवले होते असं SIT चौकशीतून समोर आलं आहे.
तसेच SIT चा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. या चौकशीचा अंतिम अहवाल येण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात असं NCB चे महासंचालक एस. एन प्रधान यांनी सांगितले आहे. कुठल्याही निर्णयापूर्वी कायदेशीर बाबी तपासून घेतल्या जातील. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या चौकशीतून समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. समीर वानखेडे यांनी मागील वर्षी २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यातून क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम गांजा तसेच दीड लाखांपर्यंत रोकड जप्त केली होती.
SIT चौकशीच्या अहवालाबाबत जी बातमी आलीय ती चुकीची – समीर वानखेडे
SIT चौकशीच्या अहवालाबाबत जी बातमी आलीय ती चुकीची आहे. २ कोर्टाने आर्यनचा जामीन फेटाळला होता. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई चुकीची होती असं म्हणता येणार नाही. गठित केलेल्या एसआयटीचा तपास हा भ्रष्टाचाराच्या दृष्टीने आहे की प्रकरणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने हे न्यायालय ठरवेल. झोनल डायरेक्टरला कुणालाही अटक करण्याचे अधिकार नाहीत. त्याचसोबत काही राजकीय आणि सूडबुद्धीने माझ्यावर आरोप करण्यात आले जे हायकोटनिही अनेकदा मान्य केले. तसेच मुंबई पोलिसांनीही खोटे आरोप असल्याबाबत क्लोजर रिपोर्ट दिला आहे असं समीर वानखेडेंनी म्हटलं.