पुणे (प्रतिनिधी) राज्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ”एमएचटी-सीईटी” परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी “ट्विट’द्वारे दिली.
नीट परीक्षेला विविध कारणांमुळे उपस्थित राहता न आलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा संधी दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) सीईटी परीक्षेसाठी एक संधी दिली मिळावी, अशी मागणी पालकांकडून होत होती. त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा सीईटीची संधी देण्याचे सुतोवाच सामंत यांनी केले.
सीईटी परीक्षा केंद्र विशेषत: शहरी भागात असतात. त्यातच शहरी भागात करोना संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. त्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्यांना परीक्षेला मुकावे लागल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्यांना परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली. त्यामुळे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशाची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.