चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात गत काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पांढरे सोने म्हणून ओळखली जाणारी कापसाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची शेवटची आशाही संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आतापर्यंत तालुक्यात ६३१ मिमी पाऊस
चाळीसगावसह तालुक्यात रविवारी सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा बसला. अवघ्या दोन ते तीन तासांत तालुक्यात २८ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे नदी, नाले खळखळून वाहू लागले आहेत. तर लघु प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरुन ओव्हर फ्लो झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यात ६३१ मिमी पाऊस झाला आहे. तर वार्षिक सरासरी ६३७ मिमीच्या जवळ पोहोचली आहे. गतवर्षी याच कालावधीत ६९३ मिमी पाऊस झाला होता. अशातच हवामान विभागाने आगामी काही दिवसातही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने खरीप हंगाम पाण्यात जाईल की काय? अशी भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले
तालुक्यात एकूण ५७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. मात्र, यंदा लाल्या रोगाने कपाशीचे नुकसान केले आहे. त्यातच सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पीक उभे राहण्याची शक्यताही संपुष्टात येत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. रविवारी पडलेल्या पावसाचे आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट होत आहेत. रविवारी खडकी मंडळात ४८.३ मिमी, तळेगाव मंडळात २०.३ मिमी, हातले मंडळात १०.८ मिमी, मेहुणबारे मंडळात ४८ मिमी, बहाळ मंडळात ३५.५ मिमी तर चाळीसगाव मंडळात १५.५ मिमी इतका पाऊस नोंदवला गेला. सध्या तालुक्यात बागायती मका व बाजरी काढणीचे काम सुरू असले तरी सततच्या पावसामुळे या पिकांनाही मोठा फटका बसत आहे. एकीकडे धरण व प्रकल्प तुडुंब भरले असले तरी दुसरीकडे खरीप हंगाम कोलमडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
 
	    	
 
















