जळगाव (प्रतिनिधी) नव उद्योजक, तरूण व विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले.
नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स यांना उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित ‘महा ६०’ हा उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरूवारी,३० नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. उद्योग संचालनालय (मुंबई) व कॉर्नेल युनिव्हर्सिटी संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महा ६०’ उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार करुन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.
शासनाने कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने महा ६० कार्यक्रम (Business Accelerator Programme) राज्यात सुरु केला आहे. ‘महा ६०’ उपक्रमाबाबत अशोक जॉन व संदेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. ‘महा ६०’ उपक्रमातून प्रशिक्षित झालेले उद्योजक विकास आवटे व तरुण जैन यांनीही यांनी अनुभव मांडले. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विकास गिते, जळगाव शासकीय इंजिनिअरींग कॉलेज प्राचार्य डॉ. सुहास गाजरे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पराग पाटील यांनीही मार्गदर्शन केले. नवउद्योजक कल्याण दाणी व श्रीमती खुशी काबरा यांनी ही नव उद्योजकांसाठी आपले अनुभव मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी केले. ‘महा ६०’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रांचे व्यवस्थापक राजेंद्र डोंगरे, उद्योग निरीक्षक शरद लासुरकर, लतीत तावडे, श्रीमती प्रियंका पाटील, अनिल गाढे, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी दिनेश गवळे यांनी परिश्रम घेतले.