नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विरुद्धच्या लढाईत देशात लसीकरण मोहीम राबविली जात असून भारताला आणखी एक लस मिळणार आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात १८ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांना या लसीचे डोस २०२२ या वर्षात उपलब्ध होतील, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली.
अदार पूनावाला यांनी अमित शहा यांची संसदेत भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटं बैठक झाली. या बैठकीनंतर सरकारनं केलेल्या सहकार्याबद्दल पूनावाला यांनी आभार मानले आहेत. कोवोवॅक्स ही दोन डोसची लस असेल. ज्यावेळी कोवोवॅक्स लॉन्च होईल त्यावेळीच त्या लसीची किंमत लोकांना समजेल. लहान मुलांसाठी असणारी ही लस येत्या २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होणार असल्याची महत्त्वाची माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, आम्हाला सरकार पाठिंबा देत असून कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण नाही आहे. सरकार देत असलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. कोवोवॅक्स ही लस मोठ्यांसाठी ऑक्टोबरपर्यंत येईल अशी मला आशा असल्याचं सांगत आम्ही नेहमीच लस उत्पादक क्षमता वाढवण्याच्या प्रयत्न करत राहिलो असल्याचंही ते म्हणालेत.
२ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. भारतात या व्हॅक्सिनला मान्यता मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्स नावाने वितरित केली जाणार आहे. ही लस नोवाव्हॅक्सने विकसित केली आहे. कोरोनावर कोवोव्हॅक्स लसीचे दोन डोस प्रभावी असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. अमेरिकेत झालेल्या ट्रायलमध्ये गंभीर संक्रमित रुग्णांवर लस ९१ टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या संक्रमणावर १०० टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.