वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १२ लाखांहून अधिक आहे. तर, चार लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासात मात्र धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील संशोधन अभ्यासानुसार, जानेवारी २०२० ते जून २०२१ या काळात भारतात कोरोना महासाथीच्या आजारामुळे जवळजवळ ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनामुळे ३४ ते ४९ लाखजणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या भारत सरकारने दिलेल्या आकडेवारीपेक्षा दहापटीने अधिक आहे. भारतातील कोरोना परिस्थितीतीबाबतचा अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रम्हण्यम यांचाही समावेश आहे. अमेरिकेतील संशोधन अभ्यासानुसार, जानेवारी २०२० ते जून २०२१ या काळात भारतात कोरोना महासाथीच्या आजारामुळे जवळजवळ ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. फाळणी झाल्यानंतर स्वंतत्र भारतातील सर्वाधिक मृतांची संख्या आहे.
‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’ने अहवालात भारतातील मृत्यूच्या अंदाजाची तीन रूपरेषा तयार केली आहेत. त्यानुसार भारतातील अधिकृत करोना मृत्यूची संख्या दहा पटीने जास्त असल्याचे दर्शवते. अभ्यासात नमूद केल्याप्रमाणे एका मध्यम अंदाजानुसार, सात राज्यांतील राज्य-पातळीवरील नागरिकांच्या नोंदणीवर आधारित, अतिरिक्त ३४ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले आहे.
दुसर्या गणनेनुसार, भारतीय सीरो सर्वेक्षणातील आकडेवारीच्या आधारे वय-विशिष्ट संसर्ग मृत्यू दराचा (आयएफआर) आंतरराष्ट्रीय मानकांचा अंदाज लागू केल्यास मृतांची संख्या सुमारे ४० लाख इतकी होते. अहवालातील तिसरी गणना ही, ग्राहक पिरॅमिड घरगुती सर्व्हेच्या विश्लेषणावर आधारित आहे. यामध्ये, पॅनेलने सर्व राज्यांमध्ये आठ लाखांहून अधिक जणांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ही ४९ लाखांच्या घरात जाते.