नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगात कोरोना बराच नियंत्रणात आला असताना चीन, रशिया आणि ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होण्याची लक्षणं दिसत आहेत. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर ब्रिटन आणि रशियात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. परदेशातून येणाऱ्या काही प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं बोललं जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चीन प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरु करण्यात आलं आहे. यासोबतच पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. मनोरंजन स्थळेही काही भागात बंद करण्यात आली असून अनेक भागांत लॉकडाऊन जाहीर कऱण्यात आला आहे. वाढत्या संक्रमणामुळे Xi’an आणि Lanzhou भागांत ६० टक्के फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. इनर मंगोलिया येथे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
रशियामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या सबव्हेरिएंटची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असं म्हटलं जात आहे की हा प्रकार पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक ठरू शकतो. कामिल खाफिजोफ नावाच्या संशोधकाने सांगितलं की AY.4.2 चा सबव्हेरिएंट सुमारे १० टक्के अधिक प्राणघातक आहे, ज्यामुळे रशियामध्ये अनेक नवीन प्रकरणे आणि मृत्यू नोंदवले जात आहेत. मात्र, सध्या त्याच्या प्रसाराची गती मंद आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं की कोरोनाच्या या व्हॅरिएंटविरोधात लस प्रभावी आहे.
AY.4.2 सबव्हेरिएंटची प्रकरणे इंग्लंडमध्ये वाढत आहेत. ब्रिटेनमध्ये २७ सप्टेंबरपासून वाढलेल्या रुग्णसंख्येत ६ टक्के प्रकरणं याच व्हेरिएंटची आहेत. यूके आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या रिपोर्टमध्ये १५ ऑक्टोबरला हा खुलासा केला गेला आहे. ब्रिटेनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी बुधवारी म्हटलं, की सध्या असं समजण्याचं काही कारण नाही की हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो.